ब्लॉग

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे?

मला समाजसेवा वगैरे गोष्टी करण्याची आवड वगैरे नाही. ज्या गोष्टी पटतात त्या गोष्टी मी आजपर्यंत करत आलो. जेंव्हा चुकीची गोष्ट दिसते अथवा वाटते. त्यावर मी व्यक्त होतोच. हाच काय तो माझा मोठा दुर्गुण. कायदा खरोखर चांगला आहे. बाबासाहेबांनी एक चांगली घटना आपल्या देशाला दिली. फक्त गरज ही आहे की ती समजून त्याचे आचरण करण्याची. पुण्याच्या वा पिंपरी चिंचवडच्या अथवा कोणत्याही एखाद्या कोणत्याही शहरातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत तर त्या आहे पायाभूत सुविधा. कचरा, अपुरे रस्ते, वाहतूक कोंडी आणि पाण्याचे प्रश्न! जर विषयाच्या खोलात जायचं ठरवलं तर सगळ्या गोष्टींचे मूळ आपल्यापाशी येते. मी अनेकांना पाहतो ज्यांना कचरा कुठेही टाकण्यात काहीही वाटत नाही. बरं ह्यांना काही म्हणावं तर त्यांना ते झोबंत! दूषित पाणी व रोगराई याचे कारण आपणच आहोत. जर कायद्यानुसार आपण कुठेही कचरा फेकणे बंद केले तर रोगराईचे प्रमाण कमी होईल.

रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल बोलायला नको. सरकारकडे ते सुधारण्यासाठी कधीही पैसे नसतात. परंतु रस्त्यावर बसणारे वा गाड्या पार्क करणारे आपणच असतो. अथवा फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणारेही आपणच असतो. जोपर्यंत आपण स्वतः या गोष्टी बदलत नाही. तोपर्यंत वाहतूक कोंडीला आपणच जबादार असू. सरकारने फेरीवाले हटवणे आवश्यक आहे. पण त्यांना तिथं उभे राहिल्यावर जर धंदा होत नाही हे जर लक्षात आलं तर आपोआपच ही कीड संपून जाईल. रस्त्यावर गाडी पार्क करणार नाही ही जबाबदारी आपली आहे. आपण ते करायलाच हवे. त्यासाठी खिशाला झळ पोहचली तरीही चालेल. हा देश आपला आहे. इथले कायदे आपले आहेत. त्याचे पालन आपणच करायला हवे. त्याशिवाय हा देश पुढे जाऊ शकणार नाही. पाण्याच्या वापराबद्दल देखील असेच. माझ्या बाजूला दोन सोसायट्या आहे. ज्यांची रोज टाकी भरून किमान १५-२० मिनिटे वाहते. लोकांनी जपून वापरायला हवे यात दुमत नाही. पण हा निष्काळजीपणा देखील आपल्याला धोकादायक आहे. त्यामुळे कायदे आपले आहेत व ते समजून त्यावर अंमलबजावणी झाली तर अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.