भाषा

थोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला.

आपल्या लोकांची मुख्य अडचण ही भाषा आहे मला वाटते. बोलण्याची एक पद्धत असते. गोड बोललं तर जगही गोड बोलत. खरं सांगायचं झालं तर ही गोष्ट अमराठी लोकांना खूप चांगली जमते. आपण ही गोष्ट त्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. एक व्यावसायिक म्हणून माणूस तोडणे मला जमणं अशक्य! त्यामुळे माझ्यात जे काही थोडेफार बदल घडले त्यातील हा बदल. प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास त्यात स्वार्थ आहे. माणसं जोडण्याचा व संधीत वृद्धी करण्याचा! काल रात्री एका ओळखीच्या डॉक्टरांची भेट झालेली. त्यांना एक टू बीएचके विकत घेण्याची इच्छा आहे. त्यांना मी ह्या सदनिकेसंदर्भात बोललेलो. आणि ह्या सदनिका धारकाने आज बोलून ती संधी गमावली.

अनेकदा गोड बोलणं फायद्याचं असत! मला असं म्हणायचं नाही की गोड बोला म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या हातापाया पडा. परंतु, जिथं आपल्याला काहीतरी संबंध आहे निदान तिथं तरी भाषा योग्य व मुद्देसुत वापरा!

मी एक वेब डिझायनर आहे. वेबसाईट डिझायनिंगची कामे करतो. पुण्यात वास्तव्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top