ब्लॉग

निष्पाप सलमान

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमान खानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली?

बर ते जाऊ द्या! त्या काळवीटला निष्पाप सलमानची बंदुकीची गोळीच भेटली होती मरायला. हा सगळा ना त्या काळवीटाचा पॉप्युलॅरीटीसाठीचा स्टंट होता. आलाच असेल लक्षात! बरं वारंवार हे सिद्ध होत आलेलं आहे. किती तो गोंडस पन्नास वर्षांचा बाळ सलमान! चुका तर माणूसच करतो ना! सोडा ना कशाला त्याला सतावता. त्यापेक्षा त्यांनी डान्स कसा केला तो पहा त्या ‘टायगर झिन्दा है’ नावाच्या चित्रपटात. आणि मला सांगा प्रेमात कोण नाही पडत. आता आमचा भाई पडलेला. थोडा फार ऐश्वर्याच्या घरासमोर दंगा केला म्हणून काय बिघडलं? आणि विवेक ओबोरायचे करिअर बरबाद केले म्हणून थोडीच त्याला तुम्ही व्हिलन करून टाकता! ते म्हणतात ना ‘प्रेमात सगळं माफ असत’. मग करा ना माफ!

जे कोर्टाला वीस वर्षानंतर कळलं आणि लगेच एका दिवसाच्या जेलच्या रात्रीत झालेला त्रास कळलं ते तुम्हा लोकांना कळत नाही. आमचा भाई असाच आहे! तुम्हाला त्याची ट्यूबलाईटमधील अथवा दबंगमधील भूमिका नाही का आवडली? खरं खरं सांगा! आता टायगर काळवीटची शिकार केली म्हणून थोडीच शिक्षा होणार? ते ‘किक’ चित्रपटातील आठवत का आमच्या भाईने काय सांगितलं ते! ‘दिल मी आता हू दिमाग में न्हाई!’ घ्या ना लक्षात! इस्ट वा वेस्ट आमचा टायगरच बेस्ट!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.