नोंद

राजकीय भूमिका आणि आपण

अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे.

जेंव्हा ह्या लोकशाहीचा उत्सव असतो. त्यावेळी आम्हाला रस्त्याचे प्रश्न अथवा गुंडगिरी आठवत नाही. आम्हाला आठवते जात! माझ्या ओळखीतील उच्च विद्या विभूषित वेळ नाही अथवा माझ्या एका मताने काय होणार असे म्हणून त्यावेळी आलेली संधी स्वतःहून गमावतात. मग आमचे आमदार आणि खासदार झोपडपट्टीच्या मतदारांवर ठरतात. कारण देशातील झोपडपट्टीमधील राहणारा आमचा नागरिक १००% मतदान करतो. आपण कितीही नावे ठेवली तरीही हेच सत्य आहे. मी ज्या मतदारसंघात राहतो. तिथे एकूण मतदारांपैकी ३५% मतदार हा झोपडपट्टीत राहणार आहे. आणि आम्ही सुज्ञ लोक उठता बसता राजकारण्यांना टीका करण्यापलीकडे काहीच करीत नाही.

त्रासाची पातळी कितीही वाढू दे. आम्ही बदलत नाही. अनेकांचे तर मतदार यादीत नाव देखील नसते. आणि त्यांना ह्याचे कोणतेही गांभीर्य वाटत नाही. मग आपले प्रश्न कधी सुटतच नाहीत! अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतांना आमचे राजकारणी त्यांना कायद्यात बदल करून अधिकृत बनवतात. पण आम्हा सुज्ञ लोकांना रस्त्यावर यावेसे वाटत नाही. जाब विचाराने हा प्रकार आमच्याकडे नाही. आम्ही आधीच राजकारण्यांना गुंड/मतलबी ठरवून स्वतःचे समाधान करून घेतो! आज जे काही चालले आहे ते आपल्या भीतीमुळे आणि आपल्या राजकीय अज्ञानाचे प्रतिबिंब आहे. हे बदलायचे असेल तर आपल्याला बदलावे लागेल.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.