नोंद

कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व त्यांचे कार्य आदर्शवतच! सोलापूर, पंढरपूर, नवी मुंबई, पुणे आणि आता नाशिक! त्यांच्याविरोधात केवळ कंत्राटातून आपली चैन भागवणारेच जाऊ शकतात. त्यांचे कार्य म्हणजे कायद्याचे पुस्तक! सगळीकडे हेच झाले. सोलापुरात दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेची जागा म्हणजे मोकळं मैदान! धुळीचे लोट उठायचे! श्वसनाचे त्रास मोठ्याप्रमाणात व्हायचा! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॅट टाकण्याचा आदेश दिला. अन अनेकांच्या नाजूक भावना दुखावल्या.

भावनेपेक्षा लोकांचे आरोग्य महत्वाचे हे आमच्या गल्लीतील दादा, भाईंना कुठे माहित. राजकारण झालं अन त्यांची बदली करण्यात आली. पुढे तेच! पंढरपूर मग नवी मुंबई! सरकारी क्षेत्रात प्रामाणिक काम करणे आपल्याकडे गुन्हा मानाला जातो. असेच एक आयुक्त पिंपरी चिंचवडला लाभलेले. अवैध बांधकामाचा कर्दनकाळ म्हणजे आयुक्त श्रीकर परदेशी! उपमहापौरचा बंगल्यातील अतिक्रमण कारवाई केलेली. अशी अनेक वाखाणण्याजोगी कामे केलेली. त्यांनाही बदली. इकडे तुकाराम मुंढे यांचेही तेच नवी मुंबईतून बदलीचे कारण नियमबाह्य बांधकामे पाडली! पुढे पुण्याच्या परिवहन मंडळाचे अध्यक्ष केले गेले! कामचुकारांना तर त्यांनी थारा दिला नाहीच! पण पीएमपीएमएलच्या सेवेत मोठी सुधारणा केली. अनेक चांगले बदल घडले. छोट्या बस, सीएनजी बस! मुख्य म्हणजे  पीएमपीएमएल नफ्यात आणली. झालं महापाप बदली केली!

नाशिककर भाग्यवान म्हणायला पाहीजे! सात महिन्यात तिथे सगळे नगरसेवक एकवटले! इतकेच काय महापौर तर अविश्वास आणायच्या वल्गना केल्या! नाशिकरांनी त्यांच्या ताकदीचे दर्शन घडवले. हे आदर्शवत! अगदी महाराष्ट्र देखील त्यांच्या बाजूने उभे राहिले. नगरसेवकांचे विरोधाचे कारण काय? कशासाठी तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांनी घुसडलेली कोट्यवधींचे कंत्राटे रद्द केली. टक्केवारीचे राजकारण करून ही नगरसेवक मंडळी आपल्या चैनी पूर्ण करत असतात. पाच सात हजार पगार असणारे नगरसेवक पदासाठी दुसऱ्याच्या जीवावर का उठतात यामागे हेच कारण! झालं त्यांच्या चैनी कशा पूर्ण होणार? आले अविश्वास ठराव घेऊन!

जनतेच्या ताकदीची कल्पना आणि सदविवेक बुद्धीचे दर्शन मुख्यमंत्र्यांकडून घडले व त्यांनी अविश्वास ठराव रद्द करण्याचे आदेश दिले! महाराष्ट्राचे विवेकी राजकारणाला शोभेल हेच घडले! ह्या गल्लीदादांना ही अद्दल प्रत्येक नागरिकाने आता घडवली पाहीजे! नगरसेवकात ‘सेवक’ हा शब्दच ही मंडळी विसरून गेली आहे! ह्यांना वठणीवर आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जनतेने उघड समर्थन करणे आवश्यक आहे! मी नाशिककरांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि सामान्य महाराष्ट्रातील जनतेचे कौतुक करतो! तुकाराम मुंढे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतील तरच महाराष्ट्र अव्वल राहील व जनता सुखी होईल!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.